'हिवाळी दृष्टिकोन २०२६’ अहवालातून मोठा इशारा: उत्तर भारतात यंदा विक्रमी बर्फवृष्टी आणि पुराची शक्यता
हिमाचल प्रदेश
हिंद कुश हिमालय प्रदेशासाठी समोर आलेल्या ‘हिंद कुश हिमालय हिवाळी दृष्टिकोन २०२६’ या नवीन अहवालामुळे दक्षिण आशियातील धोक्याची घंटा वाजली आहे. काठमांडूस्थित इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट (ICIMOD), बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲटमॉस्फेरिक फिजिक्स’ यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या अहवालानुसार, प्रशांत महासागरातील एल निनो अधिक तीव्र आणि शक्तिशाली होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम केवळ एका देशापुरता मर्यादित न राहता यंदा भारत, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या अनेक देशांना बसू शकतो. अहवालात वर्तवलेल्या अंदाजानुसार, या हिवाळ्यात सामान्य प्रमाणापेक्षा अधिक पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून उत्तर भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागांत बर्फाचा थर नेहमीपेक्षा अधिक जाड राहू शकतो, तर दुसरीकडे भूतान आणि पूर्व झिझांगच्या काही भागांत बर्फाचे आच्छादन सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. वाढत्या पाऊस व बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात नेपाळसह हिमालयीन पट्ट्यात पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका वाढू शकतो, तसेच नेपाळपासून उत्तर भारतातील नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याचा आणि हवामानातील या टोकाच्या बदलांमुळे काही भागांत दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
konkansamwad 
