आधी सध्याची भूमिका पार पाडतो, बाकी वेळ ठरवेल; मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर मुंढेंचे रोखठोक उत्तर

आधी सध्याची भूमिका पार पाडतो, बाकी वेळ ठरवेल; मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर मुंढेंचे रोखठोक उत्तर

पुणे
 

    पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजच्या मैदानावर रंगलेल्या रोटरी रोटारॅक्ट फेस्टिवलमध्ये एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावत विद्यार्थ्यांसह पालकांना मोलाचा सल्ला दिला. सध्या आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत असलेल्या मुंढे यांना यावेळी 'मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?' असा थेट प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी, "मी कधीच विश लिस्टवर जगणारा माणूस नाही; जे सत्य आहे त्यावर माझा विश्वास आहे. २०१० मध्ये सोलापूरहून मुंबईत बदली झाली तेव्हाही असाच प्रश्न विचारला गेला होता. मी वर्तमानात जगतो, सध्या जी जबाबदारी हातात आहे ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे आणि पुढे काय होईल हे काळच ठरवेल," असे स्पष्ट शब्दांत सांगितले. कार्यक्रमात त्यांनी करिअर आणि पालकत्वावरही खुलेपणाने भाष्य केले. दिवसाचे ८ ते १० तास काम करणे हा आयुष्याचा एक भाग आहे, पूर्ण करिअर नव्हे; त्यापलीकडे तुम्ही कसे नेतृत्व करता यावर खरे करिअर ठरते, असे ते म्हणाले. दहावी-बारावीच्या मुलांवर गुणांसाठी दडपण आणू नये, कारण मी स्वतः कधी ६०-७० टक्क्यांच्या पुढे गेलो नाही, तरीही करिअरमध्ये कोणतीही अडचण आली नाही; केवळ कागदावरच्या शिक्षणाने किंवा पदव्यांनी सर्वकाही साध्य होत नाही, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पालकांनी स्वतः मोबाईल हातात ठेवून मुलांना मोबाईल न वापरण्याचा सल्ला देणे चुकीचे असून, आपण काय आहोत यापेक्षा आपण कसे वागतो याचेच अनुकरण नवीन पिढी करते, याचे भान ठेवण्याचे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी यावेळी केले.