पुण्यात ‘कॉकरोच क्लब’चा अनोखा प्रयोग....मनोरंजनातून तरुणांशी राजकीय संवाद साधणार

पुण्यात ‘कॉकरोच क्लब’चा अनोखा प्रयोग....मनोरंजनातून तरुणांशी राजकीय संवाद साधणार

पुणे


     नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशातील पहिल्या ‘Gen Z’ आंदोलनाचे नेतृत्व केल्याचा दावा करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आता राजकारणाची नवी वाट निवडली आहे. पक्षाने पुण्यात ‘कॉकरोच क्लब’ नावाने एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला असून, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी या क्लबचा पहिला अधिकृत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नावावरून हा एखादा सामान्य नाइटक्लब वाटत असला, तरी यामागील संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. पारंपरिक आंदोलने आणि रुक्ष भाषणांच्या पलीकडे जाऊन स्टँडअप कॉमेडी, उपहासात्मक व्यंग आणि संवादाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत सामाजिक व राजकीय विचार पोहोचवणे, हा या क्लबचा मुख्य उद्देश आहे. या पहिल्या कार्यक्रमासाठी ‘लिगेसी ऑफ बापू’ ही विशेष थीम ठेवण्यात आली होती, ज्याद्वारे महात्मा गांधींचे विचार आणि तत्त्वज्ञान आजच्या तरुण पिढीसमोर (Gen Z) नव्या ढंगात मांडण्यात आले. पुण्यातील या कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऑनलाइन नोंदणी आणि अधिकृत पासच्या माध्यमातून तरुणांना या कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश देण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन ‘मराठी कपिल’ यांसह इतर कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांचे मनोरंजन करत सामाजिक विषयांवर भाष्य केले. या सोहळ्याला पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते; मात्र पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या गैरहजेरीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सहसंयोजक आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावरून या उपक्रमाची माहिती देत लवकरच या कार्यक्रमाचा संपूर्ण भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे सांगितले आहे. पुण्यातून सुरू झालेला हा संवादाचा प्रयोग आगामी काळात देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही राबवण्याचा आयोजकांचा मानस आहे.