सोन्या-चांदीच्या दरात घसरणीची मालिका कायम......पुढच्या महिन्यातही किमतींवर दबाव राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
मुंबई
सध्या सोने आणि चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सततच्या अस्थिरतेचे पडसाद देशांतर्गत सराफा बाजारावरही उमटत असून, शनिवारी सोने आणि चांदीचे दर या वर्षातील नीचांकी पातळीवर खाली आले आहेत. अवघ्या दोन दिवसांत सोन्यात प्रति तोळा सात हजार रुपयांची, तर चांदीत प्रति किलो दहा हजार रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीला नेमका कधी ब्रेक लागणार आणि दर आणखी किती कोसळणार, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता असतानाच तज्ज्ञांनी पुढच्या महिन्यातही सोन्यात घसरण सुरूच राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. डॉलरची वाढती ताकद आणि मजबुती यामुळे मौल्यवान धातूंवर प्रचंड दबाव निर्माण झाला असून, त्यामुळेच दरात सातत्याने नरमाई पाहायला मिळत असल्याचे जाणकार सांगतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे सकारात्मक बदल होण्याची शक्यता कमी असल्याने पुढच्या महिन्यातही सोने-चांदीच्या किमतींवरील दबाव कायम राहण्याची चिन्हे आहेत. या परिस्थितीमुळे सराफा व्यावसायिकांची चिंता वाढली असून, नेमके किती रुपयांनी दर कमी होतील याचा ठोस अंदाज सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराची स्थिती आणि दराचा कल तपासून पाहणे गुंतवणूकदारांच्या हिताचे ठरू शकते, असा सल्ला सराफा व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे.
konkansamwad 
