आणखी एक वर्ष सोनं खरेदी करणं टाळा....लखनऊमधून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना नवं आवाहन.....सोन्याचे दर घसरण्यामागचं सांगितलं कारण
लखनऊ
लखनऊ येथील 'कौशल दीक्षांत समारोहात' बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याचे दर घसरण्यामागे देशवासियांनी केलेली कमी खरेदी हे महत्त्वाचे कारण असल्याचा दावा केला आहे. सोनं खरेदी करताना सामान्य नागरिक नेहमीच बजेटचा विचार करतात आणि भाव वाढल्यास खरेदी करावी की थांबावं, या संभ्रमात असतात. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वर्षभरापूर्वीच्या आवाहनाची आठवण करून देत, आता आणखी एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचं नवं आवाहन नागरिकांना केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या मते, त्यांनी वर्षभरापूर्वी अत्यंत गरज नसेल तर एक वर्ष सोनं खरेदी न करण्याची विनंती देशवासियांना केली होती. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत लोकांनी सोन्याची खरेदी कमी केली, ज्यामुळे मागणी घटून सोन्याचे दर खाली आले आणि सामान्य नागरिकांचे पैसे वाचले, असं त्यांनी नमूद केलं. याप्रसंगी मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. शास्त्रीजींनी आठवड्यातून एक वेळचं जेवण सोडण्याचं केलेलं आवाहन ज्याप्रमाणे जनतेने स्वीकारलं होतं, अगदी त्याचप्रमाणे आजही देशातील जनता आवाहनांना प्रतिसाद देते आणि अनेक जण पैसे वाचल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, असं पंतप्रधानांनी सांगितलं. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आयटीआय (ITI) विद्यार्थ्यांच्या कौशल्याचंही भरभरून कौतुक केलं. सकाळी आयआयटी (IIT) आणि दुपारी आयटीआय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा उल्लेख करत, दोन्ही ठिकाणच्या तरुणांमध्ये सारखाच उत्साह, ऊर्जा आणि काहीतरी मोठं करण्याची जिद्द असल्याचं ते म्हणाले. आयआयटी असो किंवा आयटीआय, दोन्ही संस्थांमधील विद्यार्थी देशाची खरी संपत्ती असून त्यांचा सन्मानही सारखाच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आयटीआयच्या तरुणांकडे असलेलं वेगवेगळं कौशल्य देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल आणि 'विकसित भारता'चं स्वप्न पूर्ण करण्यात या युवा शक्तीची भूमिका अत्यंत निर्णायक असेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
konkansamwad 
