दिवाळीच्या बहाण्याने बिहारमधून वडिलांना बोलावले अन् रेडीच्या जंगलात संपवले!.....पोटच्या दोन मुलांनीच रचला हत्येचा कट
सिंधुदुर्गनगरी
दिवाळीचा सण, वडिलांना भेटण्याचे निमंत्रण आणि मुलांच्या भेटीच्या आनंदाने बिहारमधून निघालेला ५६ वर्षीय पिता.मात्र महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच्या आयुष्याचा शेवट स्वतःच्याच मुलांच्या हातून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेडी येथील जंगलमय परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा अखेर सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उलगडा केला आहे. वडील सतत दारू पिऊन आईला मारहाण करत असल्याच्या कौटुंबिक वादातून दोन मुलांनी संगनमताने वडिलांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दाऊद मुसाफीर शेख (वय ५६, मूळ रा. पूर्व चंपारण, बिहार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मोठा मुलगा नजरे दाऊद आलम (वय ३१) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्याच्या अल्पवयीन भावालाही या गुन्ह्यातील सहभागाच्या संशयावरून विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
दिवाळीच्या निमित्ताने वडिलांना बोलावले!
या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी बिहारमधील कौटुंबिक वादात दडलेली असल्याचे तपासातून समोर आले आहे. मृत दाऊद शेख यांचा मोठा मुलगा नजरे हा सावंतवाडी तालुक्यातील किनळे परिसरात कंत्राटदार म्हणून काम करत होता. त्याचा अल्पवयीन भाऊही त्याच्यासोबत राहत होता.मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मूळ गावी वडील दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून कुटुंबाला त्रास देत असल्याने मुलांमध्ये नाराजी होती. याच त्रासाला कंटाळून आई आणि मुलांनी वडिलांना संपविण्याचा कट आखल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.दिवाळीच्या निमित्ताने वडिलांना फिरण्यासाठी गोव्याकडे बोलावण्यात आले. मुलाच्या निमंत्रणावर विश्वास ठेवून दाऊद शेख बिहारहून रेल्वेने गोव्याच्या दिशेने रवाना झाले. वास्को-द-गामा मार्गावरील रेल्वेने प्रवास करून ते रात्री साधारण दोन वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्थानकावर पोहोचल्याची माहिती तपासातील घटनाक्रमातून समोर आली आहे.
मुलांसोबतचा प्रवास ठरला अखेरचा!
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर वडिलांची मुलांशी भेट झाली. त्यानंतर मुलांनी त्यांना सोबत घेऊन आरोंद्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. मुलांसोबत आपण जात असल्याने वडीलही आनंदात होते. मात्र, या प्रवासाचा शेवट इतका भयानक असेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांनी ठरविलेल्या योजनेनुसार वडिलांना रेडी-मोडकावड परिसरातील जंगलमय भागात नेले. तेथे त्यांचा खून करून मृतदेह निर्जन जंगलात टाकल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी आपल्या राहत्या ठिकाणी परतले.
१० नोव्हेंबरला जंगलात आढळला मृतदेह; पोलिसांसमोर मोठे आव्हान!
१० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेडी येथील जंगलमय परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. विशेष म्हणजे हा मृतदेह हमरस्त्यापासून दूर जंगलमय भागात असल्याने प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले होते.सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने आणि मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.मात्र, हा मृत्यू नैसर्गिक नसून खुनाचा प्रकार असल्याचा संशय बळावत गेला. अखेर २० नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) व २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही, रेल्वे आणि मोबाईलने उलगडले हत्येचे गूढ!
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार केली.पोलिसांनी तपासासाठी केवळ प्रत्यक्ष चौकशीवर अवलंबून न राहता तांत्रिक पुराव्यांची साखळी तयार केली. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून प्रवासाची माहिती मिळविण्यात आली. मृत व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच नातेवाईकांची माहिती आणि मानवी माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.या सर्व धाग्यांची सांगड घालत पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली. मृत व्यक्ती दाऊद मुसाफीर शेख असून तो बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर तपासाची दिशा मृताच्या मुलांकडे वळली. नजरे दाऊद आलम आणि त्याचा अल्पवयीन भाऊ हे सध्या सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पहाटे आरोंद्यात सापळा; दोन्ही भाऊ ताब्यात!
तांत्रिक पुरावे आणि मानवी माहितीच्या आधारे पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी पहाटे आरोंदा परिसरात सापळा रचून दोन्ही भावांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मृत दाऊद मुसाफीर शेख हे आपले वडील असल्याचे त्यांनी सांगितले.वडील सतत दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत तसेच आईला मारहाण करत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून दोघांनी संगनमताने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वडिलांचा खून करून मृतदेह लपविण्याच्या उद्देशाने रेडी येथील जंगलमय भागात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणात मोठा मुलगा नजरे दाऊद आलम याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. अल्पवयीन भावाला विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला.या तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सुधीर सावंत तसेच राजेंद्र जामसंडेकर, सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, सुरेश राठोड, प्रकाश कदम, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्साल्विस, अविनाश ओटवणेकर, अमर कांडर आणि महेश्वर समजिसकर आदी पोलीस अंमलदार सहभागी होते.सायबर पोलीस ठाण्याचे फ्रिडम बुथेलो व धनश्री परब, एटीबीचे योगेश साटम, सावंतवाडी एसडीपीओ कार्यालयातील सिद्धार्थ प्रभूतेंडोलकर तसेच सीसीटीएनएसचे ऋषिकेश टोपले यांनीही तपासात सहकार्य केले.
अनोळखी मृतदेहापासून खुनाच्या उलगड्यापर्यंत
रेडीच्या जंगलात आढळलेला अनोळखी मृतदेह, बिहारमधील व्यक्तीची ओळख, रेल्वे प्रवासाचे धागेदोरे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि अखेर मृताच्या मुलांपर्यंत पोहोचलेला तपास... अशा अनेक टप्प्यांतून या गुंतागुंतीच्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले.एका अनोळखी मृतदेहामागील रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि मानवी कौशल्याच्या वापरामुळे या प्रकरणातील संशयित निष्पन्न झाले. या कामगिरीबद्दल वरिष्ठांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
konkansamwad 
