शक्तीपीठ महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्गात आणा - नगराध्यक्ष संदेश पारकर

शक्तीपीठ महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्गात आणा - नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली 

 

    शक्तीपीठ महामार्गाची नवीन अलायनमेंट केली जात आहे. यात प्रस्तावित मार्ग राधानगरी परिसराच्या जवळून जात आहे. त्यापुढे हा महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, अशी भूमिका कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडली.कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. ते म्हणाले, राधानगरी ते सिंधुदुर्ग अंतर सुमारे ३० किमी असून, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (NH 66) ला जोडावा किंवा ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार सह्याद्री पायथ्याशी समांतर नवीन मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा, असे त्यांनी सुचवले. या निर्णयामुळे सह्याद्री पायथ्याच्या गावांचा सर्वांगीण विकास, आर्थिक दळणवळण आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.महामार्गाची आखणी करताना कणकवली, ओरोस, कुडाळ आणि सावंतवाडी या शहरांना थेट कनेक्टिव्हिटी देणे अत्यावश्यक असल्याचेही पारकर यांनी नमूद केले. तसेच प्रस्तावित संकेश्वर-रेड्डी चौपदरीकरण आणि घोटगे-पाटगाव महामार्गाशी जोडणी केल्यास सिंधुदुर्ग-कोल्हापूर प्रवासाचा कालावधी सध्याच्या ३ ते ३.५ तासांवरून अवघ्या १ ते १.५ तासांवर येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.सध्याच्या अलाइनमेंटमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने थेट फायदा होत नसून त्याचा अधिक लाभगोव्याला होत असल्याची टीका त्यांनी केली. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा असल्याने त्याचा प्राथमिक फायदा राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच व्हावा, ही आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.सिंधुदुर्ग हा राज्यातील महत्त्वाचा पर्यटन जिल्हा असून, या महामार्गामुळे गोव्याऐवजी सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राधानगरीमार्गे मार्ग दिल्यास सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, सावंतवाडीतील मोती तलाव व राजवाडा, दाजीपूर अभयारण्य, आंबोली व सावडाव धबधबा, रांगणागड तसेच देवगड-मालवण-वेंगुर्ला किनारपट्टी या पर्यटनस्थळांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच 'शक्तिपीठ' संकल्पनेनुसार कुणकेश्वर, आंगणेवाडी, माणगाव दत्त मंदिर, वालावल लक्ष्मीनारायण मंदिर आणि धामापूर येथील भगवती मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांनाही थेट लाभहोऊन धार्मिक पर्यटनात वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गात येत असून, राधानगरीमार्गे कनेक्टिव्हिटी दिल्यास ही संख्या आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जर महामार्ग थेट गोव्यात उतरवला, तर पर्यटक सिंधुदुर्ग टाळून थेट गोव्यात जातील, ज्यामुळे जिल्ह्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भविष्यात पर्यायी मार्ग विकसित झाल्यास NH 66 वरील वाहतूक कमी होऊन कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, ओरोस आणि कसाल या शहरांवर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.राधानगरीमार्गे मार्ग देऊन चिपी विमानतळ (सिंधुदुर्ग एअरपोर्ट) तसेच देवगड आणि रेड्डी बंदरांशी जोडणी केल्यास संपूर्ण कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा निष्कर्ष पारकर यांनी व्यक्त केला.