जिल्हास्तरावर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची स्थापना.

जिल्हास्तरावर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची स्थापना.

सिंधुदुर्ग.

     जिल्ह्यात अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री, परराज्यातून जिल्ह्यात होणारी वाहतूक आदी संबंधी बाबीवर नियंत्रण  मिळविण्यासाठी  जिल्हास्तरावर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची (Anti Narcotics cell)  स्थापना करण्यात आली आहे. अंमली पदार्थाबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्याबाबत जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या 02362 -228200 किंवा डायल 112 वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे. तसेच पोलीस ठाणेस्तरावरही कारवाईसाठी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. त्यांच्याकडून गोपनिय माहिती घेवून कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
   उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी व कणकवली, पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शा. आणि सर्व पोलीस सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकरी यांची बैठक घेवून त्यांना अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री यादृष्टीने कारवाईबाबतचे आदेश देवून सलग 4 तास अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली.
    गोपनियता बाळगून अचानकपणे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी व वेगवेगळ्या ठिकाणी सर्व 13 पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांच्याकडून धाडसत्र व शोध मोहिम राबविण्यात आली. तसेच गस्तही करण्यात आली. अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले. मोहिमेमध्ये कणकवली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात एक इसम अंमली पदार्थाचे सेवन करीत असताना मिळून आल्याने त्याच्याविरुध्द कणकवली पोलीस ठाणे गु.र.नं. 311/2023,गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ 1985 कलम 8 (क), 27 अन्वये गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
   अंमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 उपविभागीय पोलीस अधिकारी 24 पोलीस अधिकारी व 83 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. अशाच प्रकारे अंमली पदार्थाचे  सेवन, विक्री, वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाई सुरु राहणार आहे.