कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांची नाटिका आकाशवाणीवरून होणार प्रसारित......बालदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सावंतवाडी
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडी या शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी येथे 'प्रदूषणकारी राक्षस' ही पर्यावरणपूरक नाटिका यशस्वीरीत्या ध्वनिमुद्रित केली. बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने शाळेने या नाटिकेची निर्मिती केली आहे. या नाटिकेचे प्रसारण १४ नोव्हेंबर अर्थात बालदिनाच्या दिवशी आकाशवाणीवरून होणार आहे.या नाटिकेचे लेखन सौ. स्नेहल फणसळकर-माळकर (माणगाव) यांनी केले असून, दिग्दर्शन शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री. धोंडी गंगाराम वरक यांनी केले आहे. तर सूत्रधार म्हणून श्रीमती रश्मी मुसळे-साळगावकर यांनी काम पाहिले आहे.नाटिकेमध्ये चिंटू व कासव ही दुहेरी भूमिका ध्रुव नाडकर्णी याने, मिंटूची भूमिका युगराज सावरवाडकर याने, खेकडा व मिंगी मासोळी या भूमिका आत्रेया आचार्य हिने, तर चिंगी मासोळीची भूमिका श्राव्या परब हिने साकारली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून पर्यावरण प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश प्रभावीपणे मांडला आहे.बालदिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणविषयक नाटिका सादर करून त्याद्वारे जनजागृती करावी, या संकल्पनेतून शाळेने हा उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांना आकाशवाणीसारख्या प्रतिष्ठित माध्यमावर आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यामध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.या उपक्रमासाठी संस्था संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
konkansamwad 
