पावसाने दांडी मारल्याने भातपीक धोक्यात; जिल्हाधिकाऱ्यांकडून परुळे, म्हापण भागात बांधावर जाऊन पाहणी

पावसाने दांडी मारल्याने भातपीक धोक्यात; जिल्हाधिकाऱ्यांकडून परुळे, म्हापण भागात बांधावर जाऊन पाहणी

परुळे

 

      पावसाने दीर्घकाळ दांडी मारल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे भात पिकासह अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून विहिरींच्या पाणी पातळीतही घट होत आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण, परुळे, रावडस, कुशेवाडा या गावांना भेट देत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या परिस्थितीची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतात जाऊन पिकांची सद्यस्थिती, पिकांची वाढ, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीची पाहणी करून जलस्रोतांची माहिती घेतली.पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. "केलेली मेहनत फुकट जात आहे, हे उघड्या डोळ्यांनी पहावे लागत आहे," अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असून उत्पादनात घट होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत प्रशासन या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पिके, पर्जन्यमान आणि जलस्रोतांच्या स्थितीचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी महसूल, कृषी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुदेश राणे, तालुका अभियंता प्रफुल्ल कुमार शिंदे, कृषी सहाय्यक सुरज परब, निवती पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, जि. प. सदस्या यज्ञा साळगांवकर, पं. स. उपसभापती सचिन देसाई, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे, ग्रामविकास अधिकारी आनंद परुळेकर, म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच सुरेश ठाकूर, तलाठी श्रीम. पराडकर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.