वेंगुर्ला - पणजी एसटीत स्टेपनी चाक चक्क प्रवाशांच्या सीटवर. वेंगुर्ला आगाराचा अजब कारभार.

वेंगुर्ला - पणजी एसटीत स्टेपनी चाक चक्क प्रवाशांच्या सीटवर.  वेंगुर्ला आगाराचा अजब कारभार.

वेंगुर्ला.

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मध्ये चक्क सीटवर एसटीचे अतिरिक्त चाक (स्टेपनी) ठेवल्याची घटना घडली.आज सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला आगारातून निघालेल्या वेंगुर्ला ते पणजी (एम एच १४ बीटि २३८४) एसटीमधे एसटीचे अतिरिक्त चाक (स्टेपनी) बांधलेल्या अवस्थेत ठेवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह इतर प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली.
    वेंगुर्ला ते पणजी एसटीमध्ये गोवा राज्यात कामानिमित्त जाणारा प्रवाशीवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने गाडीमध्ये नेहमी सीट मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असते.यातच  एसटीच्या दोन सीटवर अतिरिक्त चाक (स्टेपनी) बांधलेल्या अवस्थेत ठेवल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.शहर व ग्रामीण भागांना जोडणारी व सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारी एसटी म्हणजेच ग्रामीण भागाची जीवनदायिनी म्हणून एसटीकडे पाहिले जाते.मात्र आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले.यावेळी ज्येष्ठ नागरिकानी मोठी कसरत करत एसटी प्रवास केला.एसटीचे ब्रीदवाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी असे असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी असल्याचे पहायला मिळाल्याने प्रवाशांनी एसटीच्या कारभाराविषयी असमाधान व्यक्त केले.एसटीमधे अतिरिक्त चाक ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा असून देखील प्रवाशांच्या सीटवर चाक का? ठेवले गेले असा प्रश्न प्रवासी वर्गातून केला जात आहे.