तुळस-काजरमळी येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम......नागरिकांचे बंधारा बांधण्यासाठी श्रमदान काजरमळी वाडीत तीन बंधारे पूर्ण...

तुळस-काजरमळी येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम......नागरिकांचे बंधारा बांधण्यासाठी श्रमदान  काजरमळी वाडीत तीन बंधारे पूर्ण...

तुळस

 

    यंदा निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तुळस-काजरमळी गोवर्धन पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा जलसंधारणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ओहोळावर बंधारे बांधण्यासाठी वाडीतील नागरिकांनी एकत्र येत श्रमदान केले.पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरावे, तसेच परिसरातील भूजलपातळीत वाढ होऊन भविष्यात पाण्याची उपलब्धता टिकून राहावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. काजरमळी वाडीत आतापर्यंत तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून, आणखी दोन बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. त्यामुळे एकूण पाच बंधारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या श्रमदानाच्या कामादरम्यान तुळस जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ यांनी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून राबविणे महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.या श्रमदानात श्री. संतोष शेटकर, श्री. विलास नार्वेकर, श्री. रोहन सावंत, श्री. आनंद धर्णे, श्री. ईश्वर ठुबरे, श्री. सिद्धेश शेटकर, श्री. आदित्य शेटकर आणि श्री. मंगेश शेटकर यांच्यासह वाडीतील नागरिकांनी सहभाग घेतला.‘आजचे श्रमदान, उद्याची पाण्याची शाश्वती’ या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम जलसंधारण, लोकसहभाग आणि पाणी बचतीचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा ठरत आहे.