मालवण येथे अनधिकृत वाळू वाहतूक डंपरवर धडक कारवाई

मालवण
अनधिकृत वाळू वाहतूक डंपरवर मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी धडक कारवाई केली. मालवण कोळंब रेवतळे सागरी महामार्गांवर ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण सात डंपर ताब्यात घेण्यात आले तर दोन डंपर रस्त्यावरच वाळू ओतून पळून गेले.तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखालील महसूल व पोलीस पथकाने ही कारवाई केली. विनापास वाळू वाहतूक करणारे सहा डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालयात नेण्यात आले. तर करवाईच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करणारा गोवा पासिंगचा एक डंपर सागरी महामार्गावर रस्त्याच्या कडेला कलंडला होता. तोही ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच दोन डंपर चालकांनी महामार्गांवर वाळू ओतली व ते पळून गेले. अशी माहिती तहसीलदार वर्षा झालटे यांनी दिली.खाडीपात्रात वाळू उपसा टेंडर दिली असतानाही अनधिकृतपणे विनापरवाना वाळू वाहतूक करणारे हे सर्व डंपर असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. पुढील कारवाई सुरु आहे. अशी माहितीही तहसीलदार यांनी दिली.