हुकूमशाही कारभाराविरोधात वेंगुर्ला एसटी कर्मचारी संघटनेचे उपोषण सुरूच

वेंगुर्ला
सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून वेंगुर्ला आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराविरोधात व त्यांच्या तात्काळ बदलीसाठी आज १ मे रोजी वेंगुर्ला आगाराच्या बाहेर उपोषण करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांकडून या कारभारविरोधात उपोषण केले गेले होते. त्यावेळी वेंगुर्ला तहसीलदार, आगारप्रमुख, वरिष्ठ अधिकारी यांनी तत्काळ अहवाल पाठवून कारवाईचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले होते. पण गेल्या तीन महिन्यात कारवाई अथवा लेखी स्वरूपात पत्र न दिल्यामुळे एसटी कर्मचारी संघाकडून आज पुन्हा आमरण उपोषण करण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांची तात्काळ बदली होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवण्याचा इशारा सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून करण्यात आला आहे. आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यात होणारा मानसिक त्रास, शिवीगाळ, धमकावणे असे 16 मुद्दे असलेली प्रत पुरावे प्रशासनाला देऊनही त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही किंवा कुठलेही कारवाई केली गेली नाही मग हे नियम अटी फक्त चालक, वाहक, यांत्रिक साठीच आहेत का? अधिकारी त्यात का डावलले जातोय हा प्रश्न या संघटनेकडून उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे हे उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विभागीय सचिव भरत चव्हाण, आगार सचिव दाजी तळवणेकर, विभागीय सहसचिव स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष सखाराम सावंत, विभागीय सदस्य महादेव भगत आदी उपस्थित होते.