राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; रेड अलर्ट जारी.

राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; रेड अलर्ट जारी.

पुणे.

   राज्यात आज देखील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, सातारा, तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सकाळ पासून सुरू असलेल्या पावसामुळे काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज वर्तविला आहे. आज रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
   पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी दिवसभर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. उत्तर छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेला कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य प्रदेश व छत्तीसगडवर सक्रिय आहे. समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेला कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. कोकण, गोव्यात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी व सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच २४ तासात ११६ ते २०४ मीमी तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २४ तासात २०४ मीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या घाट विभागात आज व उद्या तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
    आज रायगड, सिंधुदुर्ग तर पुणे व कोल्हापूरच्या घाट विभागात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पारघर ठाणे रत्नागिरी मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात व साताऱ्याच्या घाट परिसरात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भात पुढील पाच दिवस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक २३ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.