रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणातून जिल्हा विकासाचे प्रतिबिंब दिसेल : पालकमंत्री रविंद्र चव्हाण. पालकमंत्र्यांच्या हस्ते रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण.

रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणातून जिल्हा विकासाचे प्रतिबिंब दिसेल : पालकमंत्री रविंद्र चव्हाण.  पालकमंत्र्यांच्या हस्ते रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण.
रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणातून जिल्हा विकासाचे प्रतिबिंब दिसेल : पालकमंत्री रविंद्र चव्हाण.  पालकमंत्र्यांच्या हस्ते रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण.

सिंधुदुर्ग.

   कोकणवासियांसाठी रेल्वे ही जीवन वाहिनी आहे.  रेल्वेचा विकास झाल्यास कोकणचाही विकास होणार असल्याने ज्या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची जास्त वर्दळ आहे अशा स्थानकाचे सुशोभिकरण करण्याचे ठरले आणि आज जिल्ह्यातील ३ रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण करुन त्याचे लोकार्पण देखील होत आहे. या रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणातून जिल्हा विकासाचे प्रतिबिंब दिसणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.
   सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कणकवली, सिंधुदुर्गनगरी तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.  या प्रसंगी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, विधान सभा सदस्य नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शरद राजभोज, अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड आदी उपस्थित होते.  यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राणीच्या बागेचे देखील उद्घाटन झाले.
   पालकमंत्री म्हणाले, हे शासन सामान्य जनतेचे शासन आहे. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात १ लाख किलोमीटरचे रस्ते पूर्ण केले आहेत. नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. गेल्या २ वर्षांत ९२ हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कामे देखील सुरू झालेली आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. असेही ते म्हणाले.
   जिल्ह्यातील या तिनही रेल्वे सुशोभिकरणाच्या ज्यांनी ज्यांनी काम केले आहे त्या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. या स्थानकांच्या बाहेरील भागाचे सुशोभिकरण पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्रालयाने आतील भागामध्ये काम करण्याची परवानगी दिल्यास १ वर्षामध्ये आतील भागाचे देखील काम पूर्ण करणा असल्याचे ते म्हणाले. या स्थानकांचे सुशोभिकरण झाले आहे. यापुढे हे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम आपण सर्वांचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
   खासदार नारायण राणे म्हणाले, कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभीकरण, प्रवेशद्वार हे सर्व एका दुसऱ्याच्या सहकार्यातून घडलेल्या विकासाचे प्रतीक आहे.  जिल्ह्यातील बरोजगारी दूर करण्याचा माझा संकल्प आहे. रोजगार निर्माण करणारे  प्रकल्प येथे आणून जिल्ह्याचा कायापालट करायचा आहे. सिंगापूर व्हॅली प्रमाणे हजारो कोटींची गुंतवणूक करणारे पर्यटनावर आधारित प्रकल्प इथे आणायचे आहेत. विकासाची ही भव्यता, प्रगतीची भरभराट आपल्याला  घराघरात न्यायची आहे. कोकणी माणसाच्या बुद्धिमत्तेला आणि गुणात्मकतेला तोड नाही. बुद्धीच्या जोरावर कोकणचा विकास करूया असे आवाहनही श्री राणे यांनी केले.
   आमदार नितेश राणे म्हणाले  या रेल्वे स्थानकांचे झालेले सुशोभिकरण कौतुकास्पद आहे. आपण विमानतळावर असल्यासारखा भास होतो यावरुन कामाचा दर्जा लक्षात येतो. बांधकाम विभागाच्या माध्यमातून  झालेले रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण हा देशातला पहिलाच प्रयोग असणार आहे.  रेल्वे प्रवाशांच्या सर्व समस्या सोडविण्यावर आपला भर असल्याचेही नितेश राणे म्हणाले.