विकासाच्या घोषणांचा पाऊस, प्रत्यक्षात प्रकल्प कुठे?....परशुराम उपरकर यांचा सवाल
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे, मात्र प्रत्यक्षात प्रकल्प कुठे आहेत, असा सवाल उपस्थित करत ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शब्बीर मणियार उपस्थित होते.तळवणे येथील बोट बांधणी प्रकल्पातून २०० जणांना रोजगार देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प सुरू झालेला नसून केवळ सामंजस्य करार झाल्याचे उपरकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे १२० कोटींच्या प्रकल्पासाठी कंत्राटदार कंपनीचे भागभांडवल अवघे एक लाख रुपये असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून मिळाल्याचे सांगत त्यांनी प्रकल्पाच्या आर्थिक क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा, आरोंदा जेटी, डायलेसिस सेंटर, मुंबई-गोवा महामार्ग आणि पर्यटन प्रकल्पांच्या घोषणांचाही त्यांनी समाचार घेतला. घोषणा होतात, कार्यक्रम होतात, मात्र जनतेला प्रत्यक्ष सुविधा कधी मिळणार, असा सवाल त्यांनी केला.राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना नवीन विकासकामांवरील निर्बंध आणि जिल्हा नियोजन निधीतील ३० टक्के कपातीचा मुद्दा उपरकर यांनी उपस्थित केला. आगामी काळात ही कपात ५० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
konkansamwad 
