महाऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये अचानक बदल

महाऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये अचानक बदल

 

कुडाळ

 

    दहावी आणि बारावीच्या निकालानंतर कॉलेज प्रवेशाची धावपळ सुरू असतानाच महाऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये अचानक करण्यात आलेल्या बदलामुळे कुडाळमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे जातीचे व इतर आवश्यक दाखले अडकून पडले आहेत. ऐन प्रवेश प्रक्रियेच्या वेळी झालेल्या या तांत्रिक गोंधळामुळे आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी कुडाळ तहसील कार्यालयातील महाऑनलाइन सेवा केंद्रांवर पालकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी महाऑनलाइन सेवेच्या सॉफ्टवेअरमध्ये अचानक काही बदल करण्यात आले. या नवीन बदलामुळे नेमकी कोणती प्रक्रिया करायची याबाबत कमालीचा गोंधळ निर्माण झाला असून अनेक दाखले सिस्टीममध्येच अडकून पडले आहेत. ऐन प्रवेश प्रक्रियेच्या वेळी हा बदल का आणि कोणाच्या सांगण्यावरून केला, याचे स्पष्ट उत्तर सध्या कोणाकडेही नाही.यापूर्वी विविध दाखले काढण्यासाठी कमीत कमी 11 प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. पालक आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत कष्टाने ही सर्व कागदपत्रे गोळा केली आहेत. मात्र आता नवीन सॉफ्टवेअरमध्ये केवळ तीनच कागदपत्रे स्वीकारली जात आहेत. अवघ्या तीन कागदपत्रांच्या आधारे अधिकृत दाखला कसा मंजूर करायचा, असा मोठा पेच तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. पुरेशी कागदपत्रे अपलोड होत नसल्याने कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये, या भीतीने अधिकारी या दाखल्यांवर सह्या करण्यास धजावत नसल्याचे समजते.सध्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. अशा स्थितीत जर विद्यार्थ्यांना वेळेत जातीचे किंवा इतर आवश्यक दाखले मिळाले नाहीत, तर त्यांना आरक्षणाच्या जागेपासून मुकावे लागेल. हा तांत्रिक घोळ मिटेपर्यंत प्रशासनाने दाखल्यासाठी केलेल्या अर्जाची पावती ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.शासनाने या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा न काढल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता असून, पालकांमध्ये सध्या तीव्र असंतोष पसरला आहे.