दिंडोरीत कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनावरून घरी परतत असताना, भरधाव वेगातील कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात ६ निष्पाप बालकांचा समावेश असल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दिंडोरी येथील इंदोरे गावचे रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब खासगी क्लासच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. रात्रीच्या वेळी घरी परतत असताना त्यांची कार पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली. विहीर रस्त्याच्या अगदी कडेला/मधोमध असल्याने चालकाला अंदाज आला नाही आणि क्षणात संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या घरातील लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे (३२), रेशमा सुनील दरगोडे (२७), आशा अनिल दरगोडे (३२), गुणवती सुनील दरगोडे (११), श्रेयश अनिल दरगोडे (११), श्रावणी अनिल दरगोडे (११), सृष्टी अनिल दरगोडे (१४), समृद्धी राजेंद्र दरगोडे (७), श्रद्धा अनिल दरगोडे (१३) यांचा समावेश होता. रस्त्याच्या मधोमध धोकादायक स्थितीत विहीर असल्यामुळे, विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच क्लास संचालकांचीही चौकशी केली जाणार आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि नरहरी झिरवळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रस्त्याच्या मधोमध विहीर कशी असू शकते? असा संतप्त सवाल विचारत, दोषी अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित विहीर तातडीने बुजवण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे इंदोरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
konkansamwad 
