सिंधुदुर्ग जिल्हा 'आरोग्यसंपन्न जिल्हा' बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - प्रितेश राऊळ
पुणे
ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना चालना देणे आणि ग्रामस्तरावर जनसहभाग वाढविणे या उद्देशाने “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा पुणे येथे उत्साहात पार पडली.ही कार्यशाळा श्रीमती काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. पुणे, कोल्हापूर व ठाणे परिमंडळातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्तरावरील कार्यकर्त्यांना उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, कोकण संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, एमआरटीसीचे अध्यक्ष विजय रेडकर, तसेच सिंधू मित्रचे डॉ. स्वप्नील परब आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय आशा वर्कर्स, आरोग्य अधिकारी आणि काही गावांचे सरपंच यांनीही सहभाग नोंदवला.यावेळी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असून, “आरोग्यसंपन्न जिल्हा” बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
konkansamwad 
