सावधान! प्लास्टिकची फुले वापरताय? आता केवळ विक्रेताच नाही, तर 'डेकोरेटर' आणि 'हॉल' मालकालाही होणार जेल!
मुंबई
राज्यात प्लास्टिक बंदी असूनही सर्रास वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक फुलांविरुद्ध आता राज्य सरकारने 'सर्जिकल स्ट्राईक'ची तयारी केली आहे. केवळ प्लास्टिक फुलांची विक्री करणाऱ्यांवरच नाही, तर त्यांचा सजावटीसाठी वापर करणारे डेकोरेटर आणि अशा सजावटीला परवानगी देणारे मॅरेज हॉल मालक यांच्यावरही आता कठोर कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात मोठी घोषणा केली असून, लवकरच नवा शासन निर्णय (GR) निर्गमित केला जाणार आहे.प्लास्टिक बंदीची नियमावली अधिक स्पष्ट आणि परिणामकारक करण्यासाठी सरकारने व्याप्ती वाढवली आहे. प्लास्टिक फुलांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कडक पाबंदी घालण्यात आली आहे.लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांत प्लास्टिक फुलांनी सजावट केल्यास डेकोरेटर शिक्षेस पात्र ठरेल. आपल्या आवारात प्लास्टिक फुलांच्या सजावटीला मुभा देणाऱ्या हॉल मालकांवरही दंडात्मक कारवाई होईल. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका/नगर परिषद) या नियमाची अंमलबजावणी होणार नाही, तिथल्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.पर्यावरणाचे रक्षण आणि शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी प्लास्टिक फुलांचा वापर टाळण्यासाठी ही ठोस पावले उचलली गेली आहेत.

konkansamwad 
