खडकावर बसून मासेमारी करताना युवक समुद्रात बुडाला....वेंगुर्ले येथील घटना
वेंगुर्ले
वेंगुर्ले येथील लाईटहाऊस जवळील खडकावर बसून गरीने मासेमारी करताना अणसूर येथील एक युवक समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज, सायंकाळी घडली.एका मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे तो थेट समुद्राच्या पाण्यात फेकला गेला आणि काही वेळातच दिसेनासा झाला. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही.अणसूर देऊळवाडा येथील हा युवक आपल्या मित्रांसोबत मासेमारीसाठी वेंगुर्ले येथे आला होता.या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच मोचेमाड समुद्रकिनाऱ्यावर अशाच प्रकारे गरीने मासेमारी करताना एक युवक बुडाला होता. त्यानंतर वेंगुर्ले तालुक्यातील ही आठ दिवसांतील दुसरी घटना असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
konkansamwad 
