बांद्यात ३८ लाख ८० हजारांची अवैध गोवा दारू जप्त, कोल्हापूरचा चालक ताब्यात

बांद्यात ३८ लाख ८० हजारांची अवैध गोवा दारू जप्त, कोल्हापूरचा चालक ताब्यात

सावंतवाडी

 

     राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली ता सावंतवाडी जि सिंधुदुर्ग पथकाने बांदा ता सावंतवाडी जि सिंधुदुर्ग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करताना चारचाकी वाहनासह अंदाजे 38 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली पथकाने ही कारवाई केली आहे.
      मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र 66 बांदा सर्व्हिस रोडवर सलगर चहा दुकानासमोर बांदा येथे अवैध मद्य वाहतुकीच्या संशयित वाहनांची तपासणी करीत असताना रात्री १० वाजता  गोव्यातून बांद्याच्या दिशेने येणारे टाटा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे इंट्रा चारचाकी वाहन क्र एमएच 09 जीजे 8235 ची तपासणी केली असता सदर चारचाकी वाहनाच्या मागील हौद्यामध्ये ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडचे एकूण 240 कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स म्हणजे 10 हजार 50 बाटल्या इतका अवैध मद्यसाठा मिळून आला. सदर प्रकरणी वाहन चालक प्रमोद अशोक निर्मळ वय 27 वर्षे रा निर्मळ मळा यड्राव ता शिरोळ जि कोल्हापूर यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्यामध्ये अंदाजे रु 28 लाख 80 हजार किंमतीचे मद्य व रु 10 लाख किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे रु 38 लाख 80 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
    सदर कारवाई धनंजय साळुंखे दुय्यम निरीक्षक, विवेक कदम दुय्यम निरीक्षक, मिलिंद माळी दुय्यम निरीक्षक, दिपक वायदंडे जवान, संदीप कदम जवान नि वाहन चालक, सागर सुर्यवंशी जवान, सतिश चौगुले जवान, अभिषेक खत्री जवान यांनी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास धनंजय साळुंखे दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.