सावंतवाडी नगरपरिषदेची धडक मोहीम; अवैध धंदे चालणारे स्टॉल्स हटवले

सावंतवाडी नगरपरिषदेची धडक मोहीम; अवैध धंदे चालणारे स्टॉल्स हटवले

सावंतवाडी


  सावंतवाडी शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात नगरपरिषद प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने कोलगाव हद्दीवरील रस्त्यालगत थाटलेल्या अनधिकृत स्टॉल्सवर धडक कारवाई करत ते हटवण्यात आले आहेत. या अनधिकृत स्टॉल्सच्या आडोशाने अवैध धंदे सुरू झाल्याच्या तक्रारी होत्या, त्यामुळेच ही कठोर पावले उचलल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे. नगरपरिषदेच्या या अचानक केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिक आणि इतर स्टॉलधारकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. मात्र, ही कारवाई केवळ शहराच्या हद्दीपुरती मर्यादित न ठेवता मुख्य बाजारपेठ आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील अतिक्रमणे हटवण्याचे धाडसही प्रशासनाने दाखवावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे. शहरातील अनेक व्यावसायिक इमारतींच्या बाहेर, पदपथावर आणि इमारतींसाठी राखीव असलेल्या पार्किंगच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काही गाळेधारकांनी तर चक्क पार्किंगच्या जागेत गाड्या उभ्या करून तिथे पोटभाडेकरू नेमल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बेकायदेशीर प्रकारांमुळे पादचाऱ्यांना चालणे आणि वाहनधारकांना मार्ग काढणे कठीण झाले असून, 'सुंदर सावंतवाडी' अधिक स्वच्छ व मोकळी करण्यासाठी हे सर्व अडथळे त्वरित दूर करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण धारकांविरोधात कंबर कसली असून, अनधिकृत स्टॉलधारक आणि व्यावसायिकांना यापूर्वीच रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील अनधिकृत स्टॉल्स हटवून जप्त करण्यात आले होते. त्यावेळी काही राजकीय पक्षांनी या कारवाईला विरोध दर्शवत, स्टॉलधारकांची प्रथम पर्यायी व्यवस्था करावी आणि त्यानंतरच कारवाई करावी अशी भूमिका घेतल्याने शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. असे असतानाही प्रशासनाने आपली मोहीम सुरूच ठेवत कोलगाव हद्दीवरील अतिक्रमणांवर कारवाई केल्याने आता शहरातील इतर भागांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.