अवैध धंद्यांचे अड्डे आणि अतिक्रमणांचा समूळ नायनाट करणार : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले

अवैध धंद्यांचे अड्डे आणि अतिक्रमणांचा समूळ नायनाट करणार : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले

सावंतवाडी
 

    सावंतवाडी शहराच्या कोलगाव नदीपरिसरात सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आगामी काळात अधिक आक्रमकपणे राबवली जाईल आणि अतिक्रमणाच्या आडून चालणारे अवैध धंद्यांचे अड्डे मुळापासून उखडून टाकले जातील, असा ठाम इशारा सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी दिला आहे. कोलगाव नदीवरील अतिक्रमण कारवाईच्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना त्यांनी पालिका प्रशासनाची ही कणखर भूमिका स्पष्ट केली. या परिसरात अतिक्रमित स्टॉलच्या माध्यमातून मद्य व इतर बेकायदेशीर वस्तूंची खुलेआम विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, हा संपूर्ण भाग अवैध कृत्यांचा अड्डा बनला होता. विशेष म्हणजे, बुधवारी या भागात पाहणीसाठी गेलेल्या एका नगरपालिका अधिकाऱ्यावर तेथील एका मद्यधुंद व्यक्तीने दगडाने हल्ला केला होता. या मारहाणीत संबंधित अधिकाऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत, अशा गैरप्रकारांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नसून ते समूळ नष्ट करण्यासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितले. 'स्वच्छ आणि सुंदर सावंतवाडी' ही शहराची असलेली ओळख अधिक दृढ करण्यासाठी ही अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्रतेने सुरूच राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.