लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून ३ कोटी ९९ लाख रुपये प्राप्त.

लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून ३ कोटी ९९ लाख रुपये प्राप्त.

सिंधुदुर्ग.

   प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एच. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय लोक अदालत सपंन्न झाली. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५४९ प्रकरण तडजोडीने निकाली झाली. या प्रकरणातील एकूण तडजोडीची रक्कम रुपये ३ कोटी ९९ लाख ९९ हजार ४९९ अशी आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता होऊन निकाल झाल्याने त्यांच्यातील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तसेच तडजोडीच्या निकालांविरुध्द अपील होत नसल्याने त्यांच्या वेळ व पैशाची बचत झाली आहे. अनेक वर्ष दुरावलेल्या दोन जोडप्यांचे लोक अदालतीमध्ये मनोमिलन होऊन त्यांचे वैवाहिक नातेसंबंध पुर्नःस्थापित झाले.
   राष्ट्रीय लोक अदालतीसाठी सर्व तालुका न्यायालयात प्रत्येकी एक पॅनेल तसेच जिल्हा न्यायालयात दोन पॅनेल नेमण्यात आले होते. पॅनेल क्र.१ मध्ये जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती व्ही. एस. देशमुख व सहा. सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग व विधीज्ञ मिहिर भणगे यांनी काम पाहिले. पॅनेल क्र.२ मध्ये श्रीमती व्ही. आर. जांभुळे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग व विधीज्ञ श्रीमती रेखा सावंत यांनी काम पाहिले. श्रीमती एस. एस. जोशी, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग व श्रीमती एस. के. कारंडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग राष्ट्रीय लोक अदालतीसाठी उपस्थित होत्या. पॅनेल समोर दिवाणी दावे, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेशाबाबतची प्रकरणे, कर्ज वसुली प्रकरणे व सर्व प्रकारची वादपुर्व प्रकरणे तडजोड होऊन निकाली झाली.
   राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकार व विधीज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग घेतला होता.