लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेने ‘विशेष मोहिम’ राबवून वाहतुक नियमांची केली प्रभावी अंमलबजावणी.

सिंधुदुर्ग.
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दि. 10 ते 17 एप्रिल 2024 या मुदतीत "विशेष मोहिम" राबवून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा वाहतुक शाखेस दिलेले होते.
त्यानुसार जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक उदय झावरे व वाहतूक शाखेतील सर्व पोलीस अंमलदार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रहदारीच्या विविध ठिकाणी अचानकपणे मोहिम राबविली, त्यामध्ये वाहनांच्या काचांना गडद काळ्या फिल्म लावणाऱ्या 114, फैन्सी नंबरप्लेट लावून वाहने चालविणाऱ्या 130, मोबाईलवर बोलत वाहने चालविणाऱ्या 23, मोटार सायकल चालविताना हेल्मेट परिधान न करणाऱ्या 4, खाजगी वाहनांवर प्रेस पोलीस वगैरे लिहून वाहने चालविणाऱ्या 3, प्रखर लाईट लावून वाहने चालविणाऱ्या 3, मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 1, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक 1, इतर विविध मोटरवाहन कायद्याअंतर्गत 108 अशा एकूण 388 व्यक्ती विरुद्ध केसेस करण्यात आलेल्या असून त्याचा एकूण दंड 2,28,200/- (दोन लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपये) एवढा आकारण्यात आलेला आहे. विशेषतः अल्पवयीन मुले वाहन चालविताना मिळून आल्यानंतर त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्याच बरोबर पालकांचे व मुलांचे समुपदेशन देखील करण्यात आले.
या विशेष मोहिमेमुळे नागरीकांमध्ये जागृकता निर्माण झालेली आहे. वाहन धारकांनी आपल्या वाहनांच्या काचांवरील काळ्या फिल्म काढून टाकणे, वाहन चालविताना हेल्मेट वापरणे, वाहनांवर फेन्सी नंबरप्लेट न लावणे, कर्कश आवजाचे सायलेन्सर न वापरणे, मद्यप्राशन करुन वाहन न चालविणे, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने न सोपविणे, वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी, मोटार अपघातात अथवा अन्य बेकादेशीर कृत्य रोखण्यासाठी या मोहीमेतून संदेश देण्यात आलेला आहे.
यापुढेही, जिल्हा वाहतुक शाखा व पोलीस ठाणे स्तरावर वेळोवेळी विशेष मोहीम राबवून कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे.सर्व नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केलेले आहे.