मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ८ ऐवजी १६ डब्यांची चालवावी. कोकण विकास समितीकडून रेल्वे मंत्रालयासह मध्य रेल्वेकडे पाठपुरावा.

मुंबई.
मुंबई गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभापासूनच लोकप्रिय बनली आहे. गेल्या जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यापासून आजपर्यंत तिला सरासरी जवळपास ९५ टक्के भारमान मिळत आहे. या गाडीची लोकप्रियता लक्षात घेऊन ही गाडी सध्याच्या ८ ऐवजी १६ डब्यांची करावी, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीने रेल्वे मंत्रालयासह मध्य रेल्वेला पाठवले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान धावणारी (22229/22230) वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीपासूनच जवळपास हाऊसफुल्ल धावत आहे. ही गाडी रेल्वेच्या तिजोरीत चांगलाच महसूल टाकताना दिसत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या गाडीची लोकप्रियता लक्षात घेऊन मुंबई सीएसएमटी – मडगाव दरम्यान धावणाऱ्या या गाडीला १६ डब्यांचा रेक उपलब्ध करून चालवावी,अशा मागणीचे निवेदन कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी सुविधांसाठी नेहमी आग्रही असलेल्या कोकण विकास समितीने रेल्वे मंत्रालयासह रेल्वेच्या सर्व संबंधित विभागांना पाठवले आहे.
सध्या ही गाडी आठ डब्यांची चालवली जात असल्यामुळे या गाडीला सध्या मर्यादित सीट उपलब्धता असलेल्या पाहायला मिळत आहेत. या बाबींचा विचार करता या गाडीची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी ही गाडी आठ ऐवजी १६ डब्यांची चालवावी, अशी आग्रही मागणी कोकण विकास समितीने केली आहे. समितीच्या श्री. जयवंत दरेकर यांनी हे निवेदन नुकतेच सर्व संबंधितांना पाठवले आहे.