निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा मालवण पंचायत समिती सदस्यांच्यावतीने सत्कार.

निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा मालवण पंचायत समिती सदस्यांच्यावतीने सत्कार.

मालवण
 

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समिती सदस्यांच्या वतीने नुकतेच निवृत्त झालेले पंचायत समिती गट विकास अधिकारी (बी. डी. ओ.) श्री. श्याम चव्हाण यांचा निवृत्तीपर विशेष सत्कार करण्यात आला. मालवण तालुक्यातल्या तोंडवळी येथे हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती श्री. श्याम चव्हाण यांच्यासह मालवण तहसीलदार गणेश लव्हे, मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनःश्याम झाड, विद्यमान गट विकास अधिकारी पांडुरंग सावंत, गटनेते छोटू ठाकूर, पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण, गणेश तोंडवळकर, दीपक सुर्वे, संतोष गावडे, योजना कांबळी, सीमा परुळेकर, मानसी भोगावकर, माधुरी मसुरकर तसेच तोंडवळी ग्रामपंचायत सरपंच नेहा तोंडवळकर आदी उपस्थित होते. श्री गणेशाला नमन व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. तहसीलदार गणेश लव्हे, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनःश्याम झाड, विद्यमान गट विकास अधिकारी पांडुरंग सावंत यांचा शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पंचायत समिती सदस्यांचा सदिच्छापर स्वागत सत्कार करण्यात आला.या समारंभात सर्व पंचायत समिती सदस्यांच्या वतीने सत्कारमूर्ती निवृत्त गट विकास अधिकारी श्री. श्याम चव्हाण यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी तहसीलदार गणेश लव्हे, विद्यमान गट विकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, पंचायत समिती सदस्य सीमा परुळेकर, पंचायत समिती सदस्य मानसी भोगावकर, पंचायत समिती सदस्य संतोष गावडे आणि पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण अशा मान्यवरांनी निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीची प्रशंसा करत आढावा घेतला. श्याम चव्हाण यांना सर्व पंचायत समिती सदस्यांच्या वतीने मनोगताद्वारे निवृत्तीपर सदिच्छांसह त्यांच्या निवृत्तीपश्चात मार्गदर्शनाचाही विशेष आग्रह करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती श्री. श्याम चव्हाण यांनी हा 'अत्यंत भावस्पर्शी क्षण' असल्याचे सांगितले. श्याम चव्हाण यांनी त्यांच्या १९८७ साली ग्रामसेवक पदापासून सुरू झालेल्या सेवेच्या प्रवासात त्यांचे दिवंगत वडिल व कुटुंबिय तसेच विविध वरीष्ठ, सहकारी व लोकप्रतिनिधी यांचे विशेष स्मरण केले. तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या आमदारकीच्या कालावधीत विकसीत होत गेलेल्या प्रशासकीय सक्रीयतेबद्दल त्यांनी  सांगितले आणि त्यासोबत विद्यमान पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या कार्यकालात पूर्णत्वास नेलेल्या कामांची शैली त्यांनी कथन केली. कोकणातील मालवण तालुक्यातील विद्यार्थी आणि नंतर युवा वयातील ग्रामसेवक ते 'क्लास वन अधिकारी' म्हणून निवृत्ती अशी प्रशासकीय झेप घेताना त्यांनी संवाद, समन्वय आणि कार्यपूर्ती या घटकांचे स्वानुभव कथन केले. मालवण पंचायत समितीच्या वतीने सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनःश्याम झाड, पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण व सर्व पंचायत समिती सदस्यांच्या या विशेष सत्कार संकल्पनेची त्यांनी प्रशंसा केली. त्यांनी बोलताना, निवृत्ती पश्चात कधी गरज असल्यास मार्गदर्शनाचीही सहकार्यपूर्वक तयारी दर्शवली आणि सत्काराचा स्विकार करत सर्व पंचायत समिती सदस्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दिले.सलग ३९ वर्षे सेवा बजावलेले निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. श्वेता श्याम चव्हाण यांचा या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.व्हि. के  जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आयोजकांच्या वतीने तहसीलदार गणेश लव्हे, सत्कारमूर्ती श्री. श्याम चव्हाण व कुटुंबिय, विद्यमान गट विकास अधिकारी पांडुरंग सावंत, उपस्थित मान्यवर आणि  कार्यक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.