संजय आग्रे यांनी घेतली शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट, सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत वेधले लक्ष...
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील विविध प्रशासकीय त्रुटी आणि कामकाजात होणाऱ्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीवेळी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांची देखील उपस्थिती होती.या भेटीत जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील गंभीर समस्यांवर सविस्तर ऊहापोह करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार सध्या अनेक अडचणींतून जात आहे. विशेषतः शाळा, शिक्षक आणि संस्थाचालकांना प्रशासकीय कामांसाठी मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन संजय आग्रे यांनी शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले. विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि जलद गतीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न, शालेय प्रशासकीय प्रक्रियेतील गुंतागुंत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांत होणारी दिरंगाई टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आग्रे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे लावून धरली.या चर्चेदरम्यान संजय आग्रे यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना भेडसावणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींची माहिती दिली. शिक्षण विभागातील कामकाजात सुधारणा झाल्यास त्याचा थेट फायदा विद्यार्थी आणि शैक्षणिक गुणवत्तेला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाची स्वतंत्र बैठक लवकरच बोलावण्याचे जाहीर केले. या बैठकीत सर्व तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींवर सखोल चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल आणि प्रलंबित प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी यावेळी दिले.

konkansamwad 
