बेस्टकडून हे बसमार्ग बंद केले जाणार

मुंबई
मुंबईत रेल्वे बरोबरच बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुंबई शहरापासून उपनगरापर्यंत प्रवासाची मुभा देणाऱ्या या बेस्ट बसमार्गांवर किमान दरात अगदी एसी बसपर्यंतची सुविधा देण्यात आली आहे. तरीदेखील आता बेस्टच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये काही मार्गावरील बेस्ट बस सेवा बंद केल्या जाणार आहेत. काही बेस्ट मार्गांवर बस गाड्यांची संख्या कमी आणि प्रवाशांची बस थांब्यावर वाढलेली रांग पाहता बेस्टने यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेतला आहे. ज्यात अल्प प्रतिसाद असलेल्या मार्गांवरील बेस्ट बस बंद करून त्या बस जास्त गर्दीच्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यासाठी आता किमान प्रतिसाद असलेल्या बसमार्गांचा अभ्यास केला जात आहे. येत्या काळात त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सदर उपक्रमाअंतर्गत 20 पेक्षा जास्त बेस्ट बस मार्ग बंद करण्याचा विचार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त एक ते दोन तासांच्या अंतरावर प्रवास करणारे प्रवासीही अल्प असून या मार्गावरील सेवासुद्धा बंद करण्याचा विचार आहे. कमी प्रतिसाद मिळणाऱ्या बसमार्गांवरील बस इतर गर्दीच्या मार्गांवर वळवण्यासोबत रेल्वे, मेट्रोला बसची जास्तीत जास्त जोड देण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्रीनिवास यांनी दिली आहे.