सावंतवाडी-माजगावात साकारली ४० फुटी भव्य विठ्ठल मूर्ती

सावंतवाडी
आषाढी एकादशीच्या उत्साहात विठ्ठलभक्तांसाठी एक प्रेरणादायी आणि अनोखी भेट काही युवकांनी दिली आहे. सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील डॉ. अनिकेत रविंद्र निब्रे यांनी आपल्या शेतात तब्बल ४० फूट लांबीची भव्य विठ्ठल मूर्ती साकारली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे बाजूलाच वाहणाऱ्या ओहळातून गोळा केलेल्या दगडांपासून बनवण्यात आली असून जी निसर्गाशी एकरूप होत भक्तीचा अनोखा आविष्कार घडवत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर माजगावच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात साकारलेली ही दगड-गोट्यांची विठ्ठल मूर्ती सध्या पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरली आहे. डॉ. अनिकेत निब्रे यांच्या या कल्पकतेला आणि मेहनतीला त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी मोलाची साथ दिली. साई निब्रे, प्रशम वारंग, चिरायू वारंग, ऋतिका निब्रे आणि रविंद्र निब्रे हे सर्वजण या पवित्र कार्यात त्यांच्यासोबत होते. स्थानिक ओहळातून दगड गोळा करून, नैसर्गिकरित्या उपलब्ध साधनांचा वापर करत इतकी भव्य मूर्ती उभी करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या मूर्तीमुळे माजगावला एक नवीन ओळख मिळाली असून, आषाढीच्या काळात विठ्ठलभक्तांसाठी हे एक नवीन श्रद्धास्थान बनले आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार जतीन भिसे यांनी ड्रोनमधून टिपलेले या मूर्तीचे छायाचित्र तिची भव्यता आणि कलात्मकता अधिक स्पष्टपणे दर्शवते. ही केवळ एक मूर्तीची प्रतिकृती नसून, ती निसर्गाप्रती आदर आणि भक्तीचा एक सुंदर संगम बनली आहे.