समाज कल्याण विभागातर्फे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
सिंधुदुर्ग
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर २०२६ रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, डिजिटल साक्षरता व सायबर सुरक्षा जनजागृती तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विशेष अधिकारी तुषार गवळी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधांची माहिती दिली. या योजनांचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलचा वापर करताना घ्यावयाची दक्षता, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद संदेश व लिंकपासून सावध राहण्याबाबत तसेच सायबर सुरक्षेच्या विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास लेखाधिकारी उदय यादव, आरोग्य अधिकारी अश्विनी कोंडूरवार, समाज कल्याण व इतर मागास विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुण जाधव, समतादूत यांनी केले. कार्यक्रमानंतर सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले.
konkansamwad 
