रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब.......सचिवपदी सुहास सातोसकर तर खजिनदारपदी प्रदीप शेवडे
सावंतवाडी
येथील रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब, सचिवपदी सुहास सातोसकर आणि खजिनदारपदी प्रदीप शेवडे यांची निवड करण्यात आली आहे.या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा येत्या सोमवारी, ६ जुलै ला मळगाव येथील भगवती हॉल येथे संपन्न होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष रो. अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेत बोलताना मावळते अध्यक्ष भांबुरे यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला. मागच्या वर्षभरात रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब आणि व इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या विविध उपक्रमांसह एकूण ३३ सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण परब यांनी पुढील वर्षाचा मानस व्यक्त करताना सांगितले की, रोटरी क्लब सावंतवाडीने १ जुलैपासून आपल्या नव्या कार्यकाळाची धुरा सांभाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली ५४ वर्षे कार्यरत असलेल्या या क्लबच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या, वंचित आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचून सेवा कार्य करण्याचा आमचा संकल्प आहे. आगामी काळात वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावर विशेष भर दिला जाईल, तसेच सावंतवाडी आणि दोडामार्ग भागात ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्याचा मानस आहे.या पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ भांबुरे, सचिव रो. सुहास सातोसकर, खजिनदार रो. प्रदीप शेवडे यांच्यासह अनंत उचगावकर, सत्यजित धारणकर, सुधीर नाईक, अॅड. जायबा धुरी आणि आबा कशाळीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
konkansamwad 
