सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव देण्यास मंजुरी

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव देण्यास मंजुरी

मुंबई


     मुख्यमंत्री सचिवालयात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. यामध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामकरणासह शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, मंदिर ट्रस्टला जमीन आणि नागपूर बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी शुल्क माफी यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.कोकण रेल्वेचे शिल्पकार व ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी यामुळे मार्गी लागली असून, नामकरणाचा प्रस्ताव आता केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. 
     ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात मौजे सागाव सोनारपाडा येथे असलेल्या पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या जमिनीवरील ट्रस्टचा वापर नियमित करून नाममात्र दरात जमीन हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली.नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी थेट खरेदी करण्यात येणाऱ्या जमिनीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. हिंगणा तालुक्यातील मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) येथील जमीन या प्रकल्पासाठी खरेदी करण्यात येणार आहे.