११ हजार आंब्यांची आकर्षक आरास.....कुणकेश्वर येथे रंगला आंबा महोत्सव
देवगड
दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधली गेलेले श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे हापूस महोत्सव साजरा होत आहे.दरवळून निघाली होती. कुणकेश्वर येथे हाआंबा महोत्सव रंगला असून श्री कुणकेश्वर चरणी यावेळी११ हजार आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. कुणकेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा आंबा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात मंदिर परिसर ११ हजार देवगड हापूस आंब्यांच्या सुगंधाने दरवळून गेला होता.यावर्षीची या मंदिरातील आकर्षक आंबा आरास आणि कलाकृती साकारण्यासाठी अनिकेत पेडणेकर, संकेत चव्हाण, आदित्य पेडणेकर, दर्शन सुतार, स्वप्नील सुतार, प्रदीप मुणगेकर आणि शुभम पेडणेकर यांनी भरपूर मेहनत घेतली होती. त्यांच्या या मेहनतीमुळे यंदाचा आंबा महोत्सव अधिक देखणा आणि संस्मरणीय ठरला. यावेळी मंदिरातील श्रींच्या शिवलिंगाभोवती तसेच गाभाऱ्यात आकर्षक पद्धतीने देवगड हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती. तसेच बाहेरील नंदीगाभाऱ्यातही आंब्यांच्या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला. आंब्यांचा दरवळणारा सुगंध आणि भक्तिमय वातावरणामुळे भाविकांचे मन प्रसन्न झाले होते.दरवर्षी ११ मे रोजी साजरा होणाऱ्या या आंबा महोत्सवाला यंदा ११ वे वर्ष पूर्ण झाले.सुरुवातीला मिठमुंबरी-कुणकेश्वर येथील एका आंबा बागायतदाराने आपल्या बागेतील हापूस आंबे मंदिरात अर्पण करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यातूनच पुढे या आंबा महोत्सवाची संकल्पना आकाराला आली. आज ही परंपरा केवळ मिठमुंबरी किंवा कुणकेश्वरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण देवगड तालुक्यातील पंचक्रोशीतील आंबा बागायतदारांच्या श्रद्धेचा भाग बनली आहे.यंदा ऋतुचक्रातील बदल आणि नैसर्गिक संकटांमुळे आंबा उत्पादन कमी झाले असले, तरीही श्री देव कुणकेश्वरांच्या आशीर्वादामुळे मिळालेल्या उत्पन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अनेक आंबा बागायतदारांनी स्वखुशीने देवगड हापूसच्या पेट्या महोत्सवासाठी मंदिरात अर्पण केल्या. त्यामुळे या महोत्सवाला अधिक व्यापक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आंबा बागायतदार, भाविक आणि कुणकेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आभार मानले आहेत.
konkansamwad 
