मालवण येथील आचरे गावात रामनवमी उत्सव थाटात साजरी

मालवण
मालवण येथील आचरे गावात श्री देवरामेश्वर मंदिराचा सभामंडप भाविकांनी फुलून गेला. हरिदास बुवांचे कीर्तन रंगात आले. त्याचवेळी दुपारी 12.35 वा. च्या मुहूर्तावर रामजन्माची 'जय जय रघुवीर समर्थ' अशी ललकारी होताच तोफा दणाणल्या... मंगल वाद्ये वाजू लागली, नगारखान्यात नगारे-ताशे झडू लागले. श्रीराम जन्म होताच येथे इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागले. आचरानगरीचा हा ऐतिहासिक राम जन्मोत्सव सोहळा पहाण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.जिल्हयात सर्वत्र रामनवमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने अवघा जिल्हा दुमदुमून गेला होता. मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. या मंगलसमयी जय जय रघुवीर समर्थाच्या ललकारीबरोबर तोफा कडाडल्या, नगारे धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटात अतिशय दिमाखदार सोहळा पार पडला.इनामदार रामेश्वराच्या पूरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. आचरा पंचक्रोशीत गेले 12 दिवस रामनामात दंग झाली होती. रामेश्वर मंदिर मंडपात रामजन्मोत्सव साजरा होताच सनई, चौघडे, ताशा, झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. तोफेच्या सलामीत 'राम जन्मला गं सखी राम जन्मला' जयघोष सुरू झाला. वाद्यांच्या गजरात सजविलेल्या पाळण्यात श्री रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पाळणा गीत म्हटले गेले. गुलाल, अक्षतांची उधळण झाली. रामजन्मानंतर श्रींच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरास जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषात प्रदक्षिणा करण्यात आली. श्रींची पंचारतीसह महालदार, चोपदार, छत्रचामर, अबदागीर यांच्यासह रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा करण्यात आली. रामनामाची गीते सादर करण्यात आली. गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा रामजन्माचा आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला. सोहळ्यात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी सहभागी झाले होते. माजी आमदार वैभव नाईक या सोहळ्यास उपस्थित होते. रामनवमीच्या दिवशी सायंकाळी 6 वा. गायक समीर अभ्यंकर (ठाणे-मुंबई) संवादिनी- प्रसाद शेवडे, तबला साथ- रामकृष्ण करंबेळकर यांचे गायन झाले. गायनात आचरावासीय मंत्रमुग्ध झाले होते.श्री देव रामेश्वर मंदिरात रामजन्मला मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी हजेरी लावली.