दरमहा मोफत तांदूळ व गहू मिळवण्याची संधी; कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्वरित अर्ज करावा
कुडाळ
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ नुसार कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. तालुक्यातील ज्या पात्र नागरिकांनी अद्याप प्राधान्य कुटुंब लाभार्थी अथवा अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांसह कुडाळ तहसील कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे. प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांपर्यंत, तर शहरी भागातील अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेत समाविष्ट प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू मोफत दिले जाते; त्यासाठी अर्जासोबत शिधापत्रिका तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डच्या प्रती जोडणे गरजेचे आहे. दुसरीकडे, अंत्योदय अन्न योजनेंतर्गत विधवा निराधार, दिव्यांग निराधार आणि वृद्ध निराधार कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त सदस्य असल्यास संबंधित लाभार्थ्यांना दरमहा २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू मोफत दिले जाते. अंत्योदय योजनेच्या अर्जासोबत शिधापत्रिका, सर्व सदस्यांचे आधारकार्ड, ग्रामसभेचा ठराव आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. तरी कुडाळ तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या मोफत धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी विलंब न करता कुडाळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आपले अर्ज दाखल करावेत, असे तहसीलदार सचिन पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
konkansamwad 
