बेलापूर येथील धबधब्यात अडकलेल्या ७० पर्यटकांची सुखरूप सुटका.

बेलापूर येथील धबधब्यात अडकलेल्या ७० पर्यटकांची सुखरूप सुटका.

नवीमुंबई.

 नवी मुंबईत रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. याचदरम्यान, नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर येथील धबधब्यावर फिरायला गेलेले पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली. या एकूण ७० पर्यटकांची नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाने सुखरूप सुटका केली आहे.
   मुसळधार पावसामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी खारघर व आसपासच्या भागातील पर्यटक स्थळांवर बंदी घातली. मात्र, त्यामुळे बेलापूर येथील धबधब्यावर पर्यटकांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे.दरम्यान, रविवारी अनेक पर्यटकांनी बेलापूर येथील धबधब्याला भेट दिली. परंतु, पावसामुळे वाहणाऱ्या पाण्याचा वेग अचानक वाढला आणि एकूण ७० त्याठिकाणी अडकले. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. मुसळधार पाऊस पडत असल्याने आणि पाणी वेगाने वाहत आहे. मात्र, स्वत:चा जीव धोक्यात घालून अधिकाऱ्यांनी अडकलेल्या पर्यटकांची मोठ्या कष्टाने सुटका केली. अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचावकर्त्यांना दोरी आणि इतर उपकरणे वापरावी लागली.