राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा; कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर आजही कायम राहणार.
मुंबई.
राज्यात पावसाने जोर धरला आहे. कोकण, विदर्भ, मुंबई आणि पुण्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात आजदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, तर मध्य महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात आणि विदर्भात पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पहाटेपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावासाचा अलर्ट जारी केला आहे. आज दिवसभर शहरासह उपनगरात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईत होत असलेल्या पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकलची वाहूतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. त्याशिवाय राज्यातील इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तर बऱ्याच भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. आज सोमवारीही (२२ जुलै) राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यादरम्यान काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर, अनेक ठिकाणी प्रशासनाने खबरदारी म्हणून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आज भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार म्हणजेच २४ तासात ११६ ते २०४ मीमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात, तर गोंदिया नागपूरसह रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात उद्या २३ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी व पुणे व साताराच्या घाट विभागात २४ जुलै रोजी, पुणे व सातारच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच ११६ मीमी ते २०४ मीमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.