कोकण, विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता.

कोकण, विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता.

पुणे.

   राज्यात कोकण आणि विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात १० तारखे पर्यंत सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
   पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा आज कायम आहे. ७ जुलै पासून पुढील पाच दिवस कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ६ व १० जुलैला काही ठिकाणी तर सात ते नऊ जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तसेच नाशिक व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
   आजपासून पुढील पाच दिवस कोकणातील बहुतांश तर मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे. विदर्भात दिनांक ८ ते १० जुलै दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.