आंबोली हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हाव : मंत्री दीपक केसरकर. आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवा’चे उद्घाटन.

आंबोली हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हाव : मंत्री दीपक केसरकर. आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवा’चे उद्घाटन.

सिंधुदुर्ग.

  जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस पडतो. ही नैसर्गिक देणगी आंबोलीला लाभलेली आहे. शिवाय हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. या परिसरातले  सौंदर्य जपत आंबोली हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होऊन या परिसराचा विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
    महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आंबोली येथील ग्रामसचिवालयात ‘आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे  उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. हा महोत्सव 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान सुरू असणार आहे. यावेळी आंबोली पर्यटन माहिती पुस्तिका 2023 चे प्रकाशन व संकेतस्थळाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
    यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत, अशोक दळवी, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर,  शशिकांत गावडे, उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, प्रांताधिकारी सुशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, लेखाधिकारी सुभाष गोसावी आदी उपस्थित होते.
   श्री. केसरकर म्हणाले, आंबोली हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी आंबोली, चौकुळ, गेळे व पारपोली गावातील ग्रामस्थांनी  प्रयत्न करावेत. पर्यटनवाढीसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सर्वात जास्त समुद्रालगत असणारे थंड हवेचे ठिकाण श्रीलंका या देशात आहेत. त्या बरोबरीचे आंबोली हे सुध्दा एक थंड हेवेचे ठिकाण आपल्या कोकणात आहे. शिवाय ब्लू मॉरमॉन हे दुर्मीळ फुलपाखरु आंबोलीच्या जंगलात आढळते. आंबोली पंचक्रोशीचा विकास होत असताना या चारही गावातील स्थानिकांनी एकत्रित येऊन येथील धबधबा,  फुलपाखरु, दुर्मीळ वनसंपदा, सरपटणारे प्राणी यांची माहिती जगासमोर आणायला हवी. त्यासाठी स्वत:हून गाईड बनायला हवे, असेही ते म्हणाले. तसेच पर्यटन वाढीसाठी गावातील रस्ते, शाळा व हॉस्पीटल यांचे नियोजन करावे लागेल. त्याचबरोबर महिलांच्या रोजगार वाढीसाठी आंबोली ग्राम सचिवालयासमोरच फुडस्टॉल प्रदर्शनचे कायमस्वरुपी कसे उभे राहील, यासाठी प्रयत्न करावे. आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव दरवर्षी सुरु राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
    जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवाचे आपण ब्रँडीग करणे आवश्यक आहे.तरच जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आंबोली प्रसिध्द होईल.पर्यटन वृध्दीमध्ये हा महोत्सव म्हणजे पहिले पाऊल आहे, यापुढे आपल्याला अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवायचे आहेत. अशा उपक्रमामध्ये स्थानिकांचा सहभाग महत्वाचा असतो. वनअमृत प्रकल्पाच्या माध्यमातून देखील अनेक उपक्रम राबविले जात आहेत.आंबोली येथे वन उद्यान व फुलपाखरु उद्यानाचे नुतनीकरण तसेच धबधब्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह स्थापन करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच जंगल सफारीसाठी सायकल खरेदी करणे व निसर्ग मार्गदर्शक गाईडसाठी सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला असल्याचेही त्या म्हणाल्या.