हिवाळे येथील मातीच्या खड्ड्यात पडलेल्या गव्याची वनविभागाने केली यशस्वी सुटका.
मालवण.
तालुक्यातील हिवाळे येथील नयन कुलकर्णी यांच्या मातीच्या खड्ड्यात एक गवा पडला होता. प्रयत्न करून देखील त्या गव्याला मातीच्या चिखलातून बाहेर येता येत नव्हते. काही वेळाने जेसीबी च्या साहाय्याने आजूबाजूची झाडी बाजूला करून गव्याला बाहेर पडण्यासाठी वाट करण्यात आली.अथक प्रयत्नानंतर गव्या रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गव्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले गेले.
गवा हा वाघाच्या अन्नसाखळीतील मुख्य घटक असल्याने त्याला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ ने संरक्षित केले असून तो शेडूल एक मध्ये येतो.
सदर रेस्क्यू ऑपरेशन मालवण वनपाल अनिल राठोड, वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक शरद कांबळे, वनरक्षक पटेकर, राठोड, माने तसेच वन कर्मचारी अनिल परब, कदम, राहुल मयेकर यांचे मार्फत करण्यात आले.