कोकण संस्थेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांनी उभारली 'इको गुढी'
सावंतवाडी
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने पालघरमधील कोसबाड जिल्हा परिषद शाळेत 'इको गुढी' हा उपक्रम राबवण्यात आला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीला फाटा देत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतली. वाढते प्रदूषण आणि वृक्षतोड यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी लहान वयातच मुलांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात 'सीड बॉल्स' तयार केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पाच सीड बॉल्स बनवून ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे नियोजन केले. तसेच शाळा परिसरात २० रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी या रोपांना स्वतःच्या आवडीची नावे दिली असून ती मोठी होईपर्यंत त्यांची पूर्ण काळजी घेण्याची प्रतिज्ञाही केली. 'एक विद्यार्थी - एक झाड' ही संकल्पना राबवून भविष्यात हा उपक्रम अधिक शाळांपर्यंत पोहोचवण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, सर्व शिक्षक आणि कोकण संस्थेचे सुहास खामकर, श्वेता रहाटे, सुनिता मर्चडे, राज घोलप उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे परिसरात कौतुक होत असून, अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे भावी पिढीमध्ये निसर्गाप्रती संवेदनशीलता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
konkansamwad 
