संवादातून प्रश्न सोडविण्याला प्राधान्य; उपोषणकर्त्यांना पालकमंत्र्यांचा न्यायाचा विश्वास......स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी थेट संवाद
सिंधुदुर्गनगरी
नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्ह्यातील उपोषणकर्ते व विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रत्येक प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देत नागरिकांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.जिल्ह्यातील विविध भागांतील एकूण ११० नागरिकांनी आपल्या विविध मागण्या व समस्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या. त्यापैकी ११ प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण झाली असून, प्रलंबित प्रकरणांबाबत संबंधित नागरिकांनी आज पालकमंत्र्यांसमोर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आपली बाजू मांडली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्री राणे यांनी दिले.सहकार, जिल्हा परिषद, महसूल, कृषी, पोलीस, नगरपालिका, पाणीपुरवठा, वीज वितरण तसेच बीएसएनएल टॉवरशी संबंधित प्रश्नांसह विविध वैयक्तिक स्वरूपाच्या मागण्या यावेळी नागरिकांनी मांडल्या. प्रशासकीय कार्यवाही आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये नियमांच्या चौकटीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तोडगा काढावा, तसेच नागरिकांना त्यांच्या प्रकरणाची वस्तुस्थिती आणि कार्यवाहीची माहिती द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांना न्याय देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक प्रकरणात संवादातून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. नागरिकांनीही आपल्या समस्या मांडण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी संवादाच्या माध्यमातून त्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या थेट संवादामुळे अनेक नागरिकांना आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. संबंधित विभागांकडून प्रश्नांची दखल घेत कार्यवाही करण्याचे निर्देश मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकाटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
konkansamwad 
