सिंधुदुर्ग - नवी मुंबई विमानसेवा आणि कोरजाई - तारकर्ली फेरीबोटमुळे पर्यटन टेक ऑफ घेणार
परुळे
बरेच दिवस प्रतीक्षेत असलेली आणि विशेष मागणी असलेली सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमान फेरी अखेर सुरू होत आहे. त्यासोबतच कोरजाई ते तारकर्ली दरम्यान आधुनिक फेरीबोट सेवा सुरू होणार असल्याने परुळे गावासह कोकणातील पर्यटन क्षेत्रात दिवाळी साजरी होणार आहे.विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि खाडीप्रदेश असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत जलवाहतूक अधिक सक्षम, गतिमान आणि सुविधायुक्त करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडला होता. त्या अनुषंगाने आता प्रत्यक्ष नदी पात्रात जेटी बांधकामाला सुरुवात झाली आहे.मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.कर्ली खाडी - कोरजाई - तारकर्ली मार्गावर सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर फेरीसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या रस्त्याने या भागात पोहोचण्यासाठी सुमारे दोन तासांचा कालावधी लागतो. फेरीसेवा सुरू झाल्यास हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.मंत्री नितेश राणे यांनी मार्ग निश्चित करण्यापूर्वी जेटींची उपलब्धता, प्रवाशांच्या चढ-उताराची व्यवस्था, पाण्याची खोली तसेच प्रवासी आणि वाहनांची संभाव्य मागणी याबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते.या प्रकल्पासाठी सुरुवातीला कर्ली खाडी - कोरजाई - तारकर्ली, कर्ली खाडी - मोबार - देवबाग, देवबाग - निवती, विजयदुर्ग - अणसुरे - दडे आणि आरोंदा - किरणपाणी या पाच संभाव्य मार्गांचा विचार करण्यात आला आहे.अंतिम मार्ग निश्चित करण्यापूर्वी संबंधित मार्गांवरील जेटींची उपलब्धता, पाण्याची खोली, प्रवासी व वाहनांची मागणी तसेच अन्य तांत्रिक बाबींचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.प्रस्तावित फेरीबोट सुमारे २० मीटर लांब आणि ७.५ मीटर रुंद असणार आहे. या फेरीबोटीत प्रवाशांसह चारचाकी आणि दुचाकी वाहून नेण्याची क्षमताही असणार आहे. एका फेरीबोटीच्या बांधणीसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. फेरीबोटीचे बांधकाम शिपयार्ड किंवा सक्षम संस्थेमार्फत निर्धारित तांत्रिक निकषांनुसार करण्यात येणार आहे.फेरीसेवेच्या संचालनासह मनुष्यबळ आणि देखभालीची जबाबदारी संबंधित ऑपरेटरची राहणार आहे. तर मार्ग, वेळापत्रक आणि भाडे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर शासनाचे नियंत्रण राहणार आहे.कोरजाई - तारकर्ली होडी सेवा बंद झाल्यानंतर वाहतुकीच्या नकाशावरून कोरजाई दुर्लक्षित राहिली होती. मात्र गोवा राज्यात कदंबा बसने कायमस्वरूपी कोरजाई पर्यंत आपली सेवा आजही सुरू ठेवली होती. आता पुन्हा या फेरीबोटीमुळे कोरजाईला गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परुळे, भोगवे, किल्ले निवती सह पंचक्रोशीत आता पर्यटन व्यवसाय जोम धरत आहे. त्यालाच या दोन्ही सेवांची जोड मिळाली तर त्याचा मोठा फायदा पर्यटन व्यवसायाला होणार आहे.
konkansamwad 
