गावातील रानभाज्या आरोग्य जपतात; परंपरेचेही जतन करतात – अर्चना बंगे

गावातील रानभाज्या आरोग्य जपतात; परंपरेचेही जतन करतात – अर्चना बंगे

 

कुडाळ

 

      गावातील रानभाज्या या केवळ आरोग्य जपणाऱ्या नसून त्या आपल्या ग्रामीण संस्कृतीचे आणि परंपरेचे अस्तित्वही जपतात, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी केले. त्या नेरुर येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.यावेळी बोलताना सौ. बंगे म्हणाल्या की, नेरुर येथील "रान माणूस" म्हणून ओळख असलेले श्री. राजा शृंगारे यांच्या संकल्पनेतून रानभाज्या महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे आज कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी रानभाज्यांची प्रदर्शने आणि बाजार भरवले जात असून, ही ग्रामीण परंपरा जपण्यासाठी महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, पौष्टिक मूल्ये आणि त्यांचे आरोग्यदायी महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सौ. दीप्ती नाईक, माजी पंचायत समिती सदस्या सौ. दीपश्री नेरकर यांच्यासह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.