सावंतवाडी शहरातील खोदाई, पाणी-वीज समस्यांवरून ठाकरे सेनेचा नगरसेवकांना सवाल....आशिष सुभेदार यांचा घागर मोर्चाचा इशारा

सावंतवाडी शहरातील खोदाई, पाणी-वीज समस्यांवरून ठाकरे सेनेचा नगरसेवकांना सवाल....आशिष सुभेदार यांचा  घागर मोर्चाचा इशारा

सावंतवाडी


     सावंतवाडी शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्ते, पाणी, वीज व डास प्रादुर्भावाच्या गंभीर समस्यांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. पाच वर्षांनंतर प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक निवडून देऊनही पावसाळा सुरू झाल्यानंतर ते जनतेला दिसतच नसल्याचा आरोप त्यांनी केला.  

     प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुभेदार म्हणाले, "जनतेचा सेवक हा आपला प्रभाग म्हणजे आपले घर-कुटुंब समजून समस्या सोडवतो. पण आज सावंतवाडीतील खोदाईमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाहन चालवणे आणि पायी चालणेही जिकरीचे झाले आहे. प्रशासन पाच वर्षे सुस्त होते आणि आता निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही गायब आहेत. हे सर्व नगरसेवक थंडगार झाले की काय? मुख्याधिकारी विनायक औंधकर आणि नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी उत्तर द्यावे".त्यांनी पुढे सांगितले की, शहरात रस्ते, पाणीपुरवठा, वीज खंडित होणे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असताना नगरसेवक प्रभागात दिसत नाहीत. "नगरसेवक गेले कुठे? ते गायब झाले आहेत का? याचा शोध घेऊन पालिका प्रशासन व सत्ताधारी यांनी जाहीरपणे स्पष्ट करावे", अशी मागणी त्यांनी केली.खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकामांबाबत सुभेदार यांनी आवाज उठवल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून कामांना सुरुवात झाली आहे, असे त्यांनी सांगितले. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमधील गटबाजीमुळे या प्रभागातील कामे ठप्प होती. ठेकेदार व प्रशासनाच्या चुकीमुळे निकृष्ट दर्जाचे व अर्धवट काम सुरू आहे. ठिकठिकाणी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे."कचऱ्याची दुर्गंधी, लाईनवरील झाडी तोडणे, स्ट्रीट लाईट, अर्धवट गटार बांधकाम ही प्रमुख कामे रखडली आहेत. खोदाईही चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. गटबाजीत गुंतल्याने स्थानिक नगरसेवकांचा फटका विकासकामांना बसतो आहे. पावसाळ्यात पाणी तुंबून घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण न झाल्यास नागरिकांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालू", असा इशारा सुभेदार यांनी दिला होता.सुभेदार यांच्या इशाऱ्यानंतर पालिकेकडून जोमाने काम सुरू झाले असले तरी प्रशासनाच्या गांभीर्याअभावी जुस्तीन नगर कमानीसमोर शनिवारी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणीटंचाई असताना अशी घटना नागरिकांच्या हिताची नसल्याचे सांगून त्यांनी ठेकेदार व प्रशासनाला गांभीर्याने लक्ष देण्याचा इशारा दिला. पुन्हा अशी घटना घडल्यास संतप्त नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.