दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या कोकण विभागीय अध्यक्षपदी आयु. विद्याधर कदम
खोपोली
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न, बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धम्मसंस्था "दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या व जागतिक बौद्ध संघटनेशी जोडलेल्या धम्मसंस्थेच्या कोकण विभागीय कमिटीचे अध्यक्ष म्हणून आयु. विद्याधर धोंडु कदम यांची निवड करण्यात आली. सदरची निवड ही महाराष्ट्र राज्य अंतर्गत खोपोली येथील बुद्धविहार मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी राज्य महासचिव हेमंत जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कोकण विभाग कमिटीचे महासचिव म्हणुन पालघर येथील आयु. मिलींद भदाणे यांची निवड करण्यात आली. सदरची निवड सन २०२६ व २०२७ या दोन वर्षांसाठी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेतृत्वाखालील संघटनेची शाखा आणण्यासाठी पुढाकार घेणारे व कांदळगाव, मालवण येथील रहिवासी व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्गच्या आस्थापनेवरील अधीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झालेले आयु. विद्याधर कदम यांची निवड करण्यात आली आहे. श्री. कदम हे सिध्दार्थ विकास मंडळ कांदळगाव या मंडळाचे सन २००३ ते सन २०११ पर्यंत अध्यक्ष असताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्वप्रणालीवर चाललेल्या सामाजिक चळवळीत ज्यांनी ज्यांनी महत्वाची भुमिका बजावली होती अशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार पुरस्कृत केला होता. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित होऊ नये म्हणून शैक्षणिक मदत देण्यासाठी कालकथीत रमाकांत भागोजी कदम कांदळगावकर(सेलटॅक्स अधिकारी) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र मुंबई कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग ही संघटना स्थापन केली होती. त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून सन १९९६ साली निवड झाली होती. त्यावेळी सन १९९६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी दरवर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. न्यायालयीन सेवेत कार्यरत असताना बहुजन हिताय न्यायालयीन कर्मचारी संघटनेने देखील सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली होती.२८ एप्रिल २०२५ ला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बौद्ध संघटनांना एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग वरती विराट मोर्चा काढण्यात यशस्वी झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध कार्यकर्ते अशी ओळख निर्माण केली आहे. या मोर्चामध्ये सर्व संघटना एकत्रित आल्या व सर्व संघटनांचा महासंघ "दी बुध्दिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग" या नावाने सर्व बौद्ध संघटनांच्या पदाधिकारी व सभासद यांनी केला. अशा सामाजिक कार्यकर्ते असलेल्या विद्याधर कदम यांची महाराष्ट्र राज्य अंतर्गत कोकण विभाग मधील मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांची मिळून असलेल्या कोकण विभागीय कमिटीचे अध्यक्ष पदी झालेली निवड ही योग्य आहे अशी भावना सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
konkansamwad 
