बचतगटांच्या माध्यमातून सहकार उभा करूया- आमदार निलेश राणे

बचतगटांच्या माध्यमातून सहकार उभा करूया- आमदार निलेश राणे

 

कुडाळ

 

   महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उत्पादनांना बॅण्डिंग मिळणे गरजेचे आहे त्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होवू शकतो त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाणार आहे, असे अभिवचन शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे यांनी कार्यक्रमात उपस्थित महिला बचत गटांना दिले. येथील महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी एका विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने महालक्ष्मी हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री राणे यांनी कुडाळ शहर प्रमुख अभि गावडे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे मोठ्या कंपन्यांचे ब्रँडिंग असते, त्याच धर्तीवर शिवसेनेच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनांसाठी पॅकेजिंग आणि मार्केटिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. महिलांना व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कर्ज सुविधेसाठी जिल्हा बँकेशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ आश्वासने न देता येणाऱ्या महिनाभरात या योजना प्रत्यक्षात उतरताना दिसतील, असा शब्द त्यांनी यावेळी महिलांना दिला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की, सुरुवातीला कुडाळमधील किमान दहा बचत गट 'मॉडेल' म्हणून निवडून त्यांना बाजारपेठेसाठी सक्षम बनवले जाईल. या मेळाव्याला 'उमेद'चे गणेश राठोड यांनीही महिलांना तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभि गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेविका चांदणी कांबळी यांनी केले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने महिला बचत गटांच्या सदस्या उपस्थित होत्या.